पुष्मा सिनेमातून लोकप्रिय झालेला अभिनेता जगदीश प्रताप बंदरी याला पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादमधील पंजागुट्टा पोलिसांनी अभिनेता जगदीश प्रताप बंदरी याला अटक केली आहे. जगदीशने बॉकबस्टर सिनेमा पुष्पा: द राइजमध्ये अल्लू अर्जुनच्या मित्राची केशवची भूमिका साकारली होती. त्याला या भूमिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली होती. पुष्पा फेम अभिनेता जगदीश बंदरीवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
३० वर्षीय अभिनेता जगदीश प्रताप बंदरी एका ज्युनियर आर्टिस्टसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. तो ज्या महिलेसोबत लिव्ह-इनमध्ये होता, त्या महिलेने २९ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर मृत महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या आत्महत्येसाठी, मृत्यूसाठी अभिनेता जगदीशला जबाबदार ठरवलं आहे. तक्रार आणि तपासाच्या आधारे बुधवारी पुष्पा फेम अभिनेत्याला जगदीश प्रताप बंदरी याला कलम ३०६ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. जगदीश लिव्ह-इनमध्ये राहत असलेली महिला देखील आर्टिस्ट होती, तिने काही शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं होतं.
आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप
महिलेने २९ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, जगदीशने मृत महिलेची व्हिडिओ क्लिप बनवली होती. ती २७ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या पुरुषासोबत असताना ही क्लिप बनवली गेली होती. जगदीशने महिलेला ब्लॅकमेल करत तिचे खासगी फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिने तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
महिलेच्या मृत्यूनंतर जगदीश फरार होता. अखेर पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
आगामी प्रोजक्ट्स
अल्लू अर्जुनसोबत पुष्मा सिनेमातून जगदीशने मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर जगदीश शेवटचं माइथ्री मूव्ही मेकर्सच्या एका लहान बजेट असलेल्या ड्रामा, सत्थी गनी रेंदू येकारलुमध्ये दिसला होता. तो लवकरच नितीन आणि श्रीलीला यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन या सिनेमात दिसणार आहे. त्याशिवाय काही दिवसांत प्रदर्शित होणाऱ्या ग्रामीण ड्रामा, अंबाजीपेटा मॅरेज बँडमध्येही तो भूमिका साकारतना दिसणार आहे.