सांगोला – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज हे अभियान म्हणजे महाराष्ट्र शासनाने तुमच्या गावासाठी दिलेली एक अभिनव संधी आहे. या संधीचे सोनं करत स्थानिक मतभेद बाजूला ठेवून हे अभियान यशस्वी करा असे आवाहन सिनेअभिनेते संदीप पाठक यांनी वाढेगाव, ता.सांगोला येथे भेटी प्रसंगी केले. या गावाला मोठी नैसर्गिक देणगी चांगल्या पद्धतीची आहे.
तुम्ही थोडासा प्रयत्न केला तर गाव पुरस्कारासाठी योग्य व सुंदर होईल. तुम्हाला आणखी तीन महिने वाढवून मिळाल्यामुळे कामाची संधी मिळाली आहे, या संधीचा उपयोग करून घेऊन गाव समृद्ध करा. आपले गाव पुरस्कारात पुढे राहावे अशा शुभेच्छा सिने अभिनेत्री शिवाली परब यांनी यावेळी दिल्या.
सिने कलावंत व जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, जिल्हा अभियान कक्षातील शिवराज राठोड, सुहास चिळेकर, राज्य अभियानातील प्रवीण कोठुळे, पं.स.विस्तार अधिकारी अमोल तोडकरी यांची वाढेगाव मध्ये आगमन झाल्यानंतर बैलगाडीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांना वाढेगाव येथील त्रिवेणी संगमावर नेण्यात आले.
यावेळी वैजिनाथ घोंगडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वाढेगाव मध्ये झालेल्या कामाची तपशीलवार माहिती दिली. तसेच नदीवर व पाण्याच्या संदर्भात वृक्ष लागवडीच्या संदर्भात व नावीन्यपूर्ण राबवलेल्या कामाचा तपशील उपस्थितांच्या पुढे सादर केला.
यावेळी सरपंच कोमल डोईफोडे, उपसरपंच शिवाजी दिघे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक इंगोले, ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ होळ, ग्रा.पं.स.राहुल घोंगडे, वसंत दिघे, प्रतिभा भगत, अलका दिघे, पोलीस पाटील शुभांगी पवार, महिला बचत गटाच्या सी सी मनीषा मोरे, प्रमुख योजना सूर्यगंध व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले. याप्रसंगी बीट अंमलदार विलास बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


















