मुदखेड – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेंबोली येथील आयुष्मान आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवांच्या दर्जात महत्त्वाची भर पडली आहे. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार येथे क्वॉलिटी पॉलिसी व कार्य सूचना अधिकृतपणे लागू करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील उपकेंद्रांमध्ये रुग्णकेंद्रित, सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.
उपकेंद्र स्तरावर नागरिकांना १३ प्रकारच्या आरोग्य सेवा पूर्णतः मोफत दिल्या जातात. या सेवांमध्ये गुणवत्ता, सुरक्षितता व पारदर्शकता राखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्वॉलिटी पॉलिसी व कार्य सूचना आता प्रत्यक्ष अंमलात आणण्यात आल्या आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा नोडल अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कासराळीकर तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अंकुश गोवंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे शेंबोली आयुष्मान आरोग्य उपकेंद्रातील सेवा अधिक सक्षम, विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण ठरणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याची प्रतिक्रिया आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.


















