बदनापूर / जालना – बदनापूर आर.पी. इंग्लिश मीडियम स्कूल, बदनापूर येथे राष्ट्रीय शिक्षण दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस देशभरात साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाची आठवण म्हणून २००८ पासून या दिवसाची सुरुवात करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. विजयकुमार मलिक सर, मुख्याध्यापक आर.पी. इंग्लिश मीडियम स्कूल यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती मनीषा सूर्यवंशी मॅडम, प्राचार्या परमपूज्य ज्ञानानंद सरस्वती विद्यालय या उपस्थित होत्या.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे नाट्य, भाषण, गीत, कविता सादर करून सर्वांना प्रभावित केले. शिक्षकांनीही शिक्षण ही केवळ ज्ञानाची नव्हे तर चारित्र्यनिर्मितीची प्रक्रिया असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात मलिक सर यांनी मौलाना आझाद यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्र उन्नतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत कौशल्यपूर्णरित्या केले. राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून आर.पी. ग्रुप ऑफ स्कूलमध्ये ज्ञान, प्रेरणा आणि देशभक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळाला.




















