क्यूआर करा स्कॅन अन मिळवा गणेशोत्सव परवानगी
अमरावती, 30 ऑगस्ट, (हिं.स.) – यंदा ७ ते १७ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा होणार असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परवानगीसाठी पोलिस आयुक्तालयाच्या वतीने क्यूआर कोड स्कॅन करून देण्यात आला आहे. शहरामध्ये सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांची बैठक घेऊन गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होणार नाही व नागरिकांना गणेशोत्सव मंडळांची स्थापना करणे सोयीचे होईल, यादृष्टीने त्यांनी निर्देश दिले आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्तालयात बुधवार, २८ ऑगस्टपासून ‘एक खिडकी’ योजना सुरू झाली आहे.
शहरातील सर्व खासगी व गणेशोत्सव मंडळांना श्रींची स्थापना करण्याकरिता महानगरपालिका, धर्मदाय आयुक्त, विद्युत विभाग, वाहतूक पोलिस व इतर सर्व संबंधित शासकीय कार्यालयाची परवानगी घेणे अनिवार्य राहील. सर्व सोसायटी, अपार्टमेंटमध्ये स्थापन होणाऱ्या गणेश मंडळांना ती परवानगी घेणे अनिवार्य राहील. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जबरीने देणगी, वर्गणी गोळा करता येणार नाही. देणगी/वर्गणी वसूल करणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी असणे आवश्यक,आहे.
यावर करा नोंदणी
नागरिकांनी गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्याकरिता व परवानगीचीप्रक्रिया करण्याकरिता https://citizen.mahapolice.g ov.in/citizen/login.aspx या संकेतस्थळावर किंवा मोबाइलमध्ये क्यूआर कोड गुगल स्कॅन करून ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करून २८ ऑगस्टपासून गणेशोत्सव मंडळांनी रजिस्ट्रेशन करून परवानगी घ्यावी. ज्या मंडळांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त होणार नाहीत व अपूर्ण अर्ज सादर केल्यास, अशा मंडळांना परवानगी नाकारण्यात येईल.