ओम बिर्लांना पत्र पाठवून भाषण यथावत ठेवण्याची विनंती
नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.) : संसदेच्या अधिवेशनात सोमवारी राहुल गांधी यांनी सोमवारी 1 जुलै रोजी लोकसभेत दिलेल्या भाषाणातील काही भाग सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात आले. याप्रकरणी राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून भाषण यथावत (जसेच्या तसे) ठेवण्याची मागणी केलीय.
यापत्रात राहुल गांधी म्हणाले की, माझ्या भाषणातील बराचसा भाग कामकाजातून काढून टाकण्यात आल्याने मला धक्का बसला आहे. हे संसदेच्या नियमांच्या विरोधात आहे. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचे भाषणही आरोपांनी भरलेले होते, मात्र त्यांच्या भाषणातून एकच शब्द काढण्यात आला. याबाबत केलेला भेदभाव समजण्यापलीकडचा आहे, असे राहुल गांधी यांनी नमूद केले आहे. तसेच संसदेत जनतेशी संबंधित प्रश्न मांडण्याचा अधिकार प्रत्येक खासदाराला आहे. हेच लक्षात घेऊन मी माझे भाषण दिले. नरेंद्र मोदींच्या जगात सत्य पुसले जाऊ शकते, परंतु वास्तवात नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी लिहीलेल्या पत्रावर भाजपने पलटवार केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग काढून टाकण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणातील हिंदू आणि इतर काही धर्मांबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांचा समावेश आहे. तसेच, नरेंद्र मोदी, आएसएस, भाजपवरचा भाग नोंदीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान राहुल यांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजप खासदार बासुरी स्वराज यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात नियम 115 अंतर्गत नोटीस बजावली आहे. बासुरी स्वराज म्हणाल्या की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल आपल्या भाषणात अनेक चुकीची आणि दिशाभूल करणारी विधाने केली. यावेळी बन्सुरी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राहुल गांधींवर कारवाईची मागणीही केली आहे.