पुणे , 3 जुलै (हिं.स.) आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण आहे. शेतकरी, महागाई, केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे आणि सध्याची राजकीय परिस्थिती यामुळे लोकसभेत महायुतीला फटका बसला. हेच वातावरण कायम ठेवण्यासाठी काँग्रेस राहुल गांधी यांना वारीत आणण्याचा विचार करत आहे.
भारत जोडो यात्रा व न्याय यात्रेत राहुल गांधी पायी चालले होते. यामुळे वारीतही राहुल गांधी यांना आणल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल अशी काँग्रेसची मनीषा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रणिती शिंदे , धैर्यशील मोहिते यांनी राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये नुकतीच भेट घेतली होती.या भेटीवेळी पवारांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी राहुल गांधींनी याबाबत लवकरच कळवतो असे सांगितले होते. त्यानंतर आता राहुल गांधी वारीत सहभागी होण्याबाबत मोठी अपडेट समोर आली असून, येत्या १४ जुलै रोजी राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी दिली आहे.
शरद पवार वारीत चालणार आहेत का? याबाबत त्यांनीच यावर भाष्य केले होते. शरद पवार म्हणाले, “मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार असल्याची बातमी खोटी आहे. पंढरपूरकडे जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. तिथं एक दिवस मी थांबणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी मी तिथे थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही, तर तिच्या स्वागतासाठी तिथे जाणार आहे,” असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे.