भोकर(प्रतीनिधी)शहरातील रेल्वे भुयारी मार्ग सुरु होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला असताना अल्पावधीतच या बोगस कामाचे पितळ उघडे पडले असून भुयारी मार्गावर जागोजागी खड्डे व खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे.वाहनधारकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाच्या वतीने भुयारी मार्ग बांधून वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला परंतु पावसाचे साचलेले पाणी ईतरत्र जाण्याकरिता व्यवस्था करण्यात आली नाही परिणामी पावसाचे पाणी सदरील भुयारी मार्गातच महिनाभरापासून साचल्याने याठिकाणी तळ्याचे स्वरुप आले आहे.
यामूळे वाहनाना ये जा करिता वाहनधारकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली एकाच भुयारी मार्गाचा वापर करावा लागत असल्याने या ठिकाणी छोटे-मोठे अपघाताची मालीका सुरु आहे. संबधितांना वारंवार सूचना देऊन सुद्धा रेल्वे विभागाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. सलग एका महिन्यापासून भूयारी मार्गात पाणी साचलेले आहे.
रेल्वे विभागाने या भुयारी मार्गातील साचलेले पाणी तात्काळ काढण्याची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा साचलेल्या पाण्यामध्ये मत्स्यपालन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जनजागृती माहिती अधिकार समितीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष एजाज कुरेशी यांनी केली आहे.