राजस्थानच्या अजमेरनजीक झालेल्या अपघातात प्रवासी रेल्वेचे 4 डबे रुळाहून घसरल्याची घटना घडली. मदार रेल्वे स्थानकाजवळ एकाच रुळावर 2 गाड्या आल्यामुळे रविवारी मध्यरात्रीनंतर रात्री 1 वाजता हा अपघात घडला. दरम्यान या अपघातात कुठल्याही जीवित हानीचे वृत्त नाही.
अपघाताची माहिती मिळताच सर्व रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. मदतकार्य सुरू करण्यात आले असून रेल्वेचा डबा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अपघातानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले. हा मार्ग सुरळीत होण्यासाठी 8 ते 10 तास लागू शकतात, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने 01452429642 हा हेल्प लाईन क्रमांक जारी केला आहे. ट्रेनमधील प्रवासाबाबत माहिती मिळवण्यासाठी इच्छुकांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
यासंदर्भात रेल्वेचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (एडीआरएम) बलदेव राम यांनी सांगितले की, अपघाताचा बळी ठरलेली अजमेर-आग्रा फोर्ट साबरमती पॅसेंजर ट्रेन रविवारी संध्याकाळी 5 वाजता आपल्या निर्धारित वेळेवर निघाली होती. मात्र, रात्री 1 वाजता मदार रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वी, काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या ट्रेनमधून ट्रॅक बदलत असताना, पॅसेंजर ट्रेन बाजूला आदळली. मात्र, अपघाताची इतर तांत्रिक कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. अपघातामुळे रुळ त्यांच्या जागेवरून उखडले असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताबाबत आत्ताच काही सांगणे कठीण आहे, ही बाब तपासाधीन आहे, मात्र अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे बलदेव यांनी सांगितले.