राजू शिंदेंकडे पश्चिम विधानसभाप्रमुखपद!
उमेदवारी मिळण्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब!!
त. भा. प्रतिनिधी, दि. ९
वाळूज महानगर : दोन महिन्यांपूर्वी भाजपमधून शिवसेनेच्या ठाकरे गटात आलेल्या राजू शिंदे यांचे पक्षातील वजन वाढविण्यात येत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती करून शिंदेंना आता पक्षात सक्रीय केले आहे. पश्चिम मतदारसंघातून ते विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आतापासून तयारी करण्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे पश्चिम विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांच्या संभाव्य उमेदवारीवर शिक्कामोर्तबच झाले आहे.
पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी माजी खासदार चंद्रकांत खैरेही इच्छुक आहेत. तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केलेली आहे. मात्र अंबादास दानवे यांच्या मनात वेगळेच असल्याचे दोन महिन्यांपूर्वी दिसून आले. राजू शिंदे यांना भाजपातून ठाकरे गटात आणण्यात दानवे यांचाच मोठा वाटा असल्याची चर्चा आहे. आता पक्षात आतापर्यंत नसलेले पद तयार करून राजू शिंदेंकडे पक्षाची संघटनात्मक जबाबदारीही सोपवली आहे.
विधानसभा प्रमुख असे पद ठाकरे गटात नव्हते. विजय वाघचौरे हे शहरप्रमुख तर बाळासाहेब गायकवाड तालुकाप्रमुख ते ही पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पश्चिम विधानसभा मतदारसंघात त्यांनी कामही करण्याची सुरुवात केली आहे. परंतु राजू शिंदे यांना पश्चिम विधानसभा प्रमुख पद दिल्याने अगोदरच निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकून तयार असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली आहे.
नविन प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना महत्व दिले जात असून, निष्ठावंत शिवसैनिक डावलल्या जात असल्याने निष्ठावंतांतून नाराजीचा सूर उमटत आहे. राजू शिंदे यांना संपर्क साधला असता त्यांनी नंतर बोलतो असे म्हणत बोलणे टाळले.