सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मोक्षमार्ग सहजासहजी प्राप्त होत नाही!
-आचार्य प्रवर महंत अंकुळनेरकर बाबा
माहूर तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी
दि.०९ सप्टेंबर
: “सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा मोक्षमार्ग हा सहजासहजी प्राप्त होत नाही!”
असे प्रतिपादन आचार्य प्रवर महंत अंकुळनेरकर बाबा यांनी केले.महानुभाव पंथाचे महास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूर येथील श्री देवदेवेश्वर मंदिराच्या भव्य प्रांगणात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन महोत्सव गुरुवार दि.५ सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित धर्मसभेचा अध्यक्षीय समारोप प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष आचार्य महंत एकोव्यासबाबा, मकरधोकडा निवासी प.पू. न्यायंबासबाबा शास्त्री,महंत मुधोव्यासबाबा,आचार्य रुद्धपुरकरबाबा शास्त्री,आचार्य महंत पाचराऊतबाबा,महंत शहागडकरबाबा,प.पू.अशोक शास्त्री पुणे,हदगाव निवासी योगीराजदादा यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.या सोहळ्याचे आयोजन माहूर पिठाधिष प. पू. प. म.मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांनी केले होते.
पुढे मार्गदर्शन करतांना अंकुळनेरकर बाबा म्हणाले की, “नवदीक्षितांनी आपलं जीवन परमेश्वराला समर्पित केलं, याचा अर्थ त्यांना परमेश्वर निश्चित आपला परमानंद या लोकातही आनंद आणि मृत्यूनंतरही परमानंद प्रदान केल्या शिवाय राहणार नाही!” असे सांगून जीवनात खऱ्या अर्थाने परमेश्वराची अनन्य भक्ती केल्याशिवाय परमेश्वराचा प्रमोद शाश्वत मोक्ष मिळत नाही!” या विषयी अनेक प्रकारचे उदाहरणे देऊन त्यांनी केलेला अध्यक्षीय समारोप उपस्थितांना प्रफुल्लित करून गेला.
यावेळी मकरधोकडा निवासी प.पू.महंत न्यायंबासबाबा शास्त्री यांनी आपल्या रसाळवाणीतून भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कार्याचा परिचय देऊन बाह्यत्यागापेक्षा अंतरत्याग अत्यंत महत्वाचा असल्याचे व सर्वज्ञांनी कसा त्याग केला, सर्व जीवांच्या उद्धारासाठी कसे कार्य केले, त्याचे विस्तारपूर्वक मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे महंत मुधोव्यास बाबा यांनीही सखोल तत्त्वज्ञानात्मक विचार मांडले. त्यानंतर आचार्य ऋद्धपुरकरबाबा शास्त्री यांनी उपदेशपर विचार व्यक्त करतांना भविष्याचा वेध घेऊन भाविक सद्भक्तांनी सावधान होऊन धर्म आचरण करावे; नाही तर,
फार मोठी फसवणूक होण्याची शक्यता वर्तवून सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या उपदेश वचनांचे अध्ययन केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत स्वामींनी अज्ञान दूर करून अंधश्रद्धा निर्मुलन कार्य त्यावेळी केले, आणि खरा ईश्वर धर्म सांगितला त्या वाटेने आपण गेले पाहिजे!असा उपदेश केला. याच सोहळ्यात कुमार छत्रपती कवीश्वर,कुमार वामन कवीश्वर व संतोषदादा कवीश्वर यांनी महानुभाव तत्त्वज्ञानानुसार सन्यास दीक्षा ग्रहण केली. याप्रसंगी मान्यवर महंतांच्या हस्ते ‘महानुभाव’ या ग्रंथाच्या सातव्या आवृत्तीचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगीराजदादा यांनी केले.प.पू.विनोदशास्त्री यांनी सुरेख संचलन केले तर श्री देवदेवेश्वर संस्थान,माहूर पिठाधिष प.पू.महंत मधुकरबाबा शास्त्री कवीश्वर यांनी ऋण व्यक्त केले. अवतारदिन कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने भाविक सद्भक्त उपस्थित होते. महाप्रसादाचे वितरण होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.