मीडिया पर्सनॅलिटी आणि रामोजी समूहाचे चेअरमन रामोजी राव यांचे आज शनिवारी निधन झाल्याचे वृत्त समोर आले. पहाटे 4.50 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांचे वय 87 होते. रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 5 जूनपासून रामोजी राव आयसीयूमध्ये दाखल होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
रामोजी राव यांचे पार्थिव त्यांच्या रामोजी फिल्मसिटी येथील निवासस्थानी त्यानंतर अंत्यदर्शनसाठी पार्थिव ठेवण्यात आले आहे. रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातो आहे.
रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. रामोजी राव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली. मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स एवढे मोठे साम्राज्य त्यांनी उभारल आहे. रामोजी ग्रुपचे मुख्यालय हैदराबादेमध्ये आहे.
रामोजी ईटीव्ही नेटवर्कच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांचे प्रमुखही होते. 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून रामोजी राव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
रामोजी राव यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. रामोजी राव यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवणारे ते द्रष्टे होते. पत्रकारिता आणि चित्रपट जगतात त्यांनी अमिट छाप सोडली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, या आशयाची पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.