अक्कलकोट – सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं.1 परिसरात घडलेल्या भीषण अपघातात अक्कलकोट तालुक्यातील मनोहर दिपक कदम (वय ३६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ एम एच १२ पि टी ५७०८ या वाहनाने रस्ता ओलांडत असताना त्यांना जोराची धडक दिली.
याप्रकरणी मृताचा भाचा अविनाश राजू चव्हाण (वय २७, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. कसबा, ता. अक्कलकोट) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, अविनाश चव्हाण व त्यांचे मामा मनोहर कदम हे बुलेट मोटारसायकल एम एच १२ यु डी २४७५ वरून अक्कलकोटहून पुण्याच्या दिशेने जात असताना लघुशंकेसाठी महामार्गालगत थांबले होते.सोमवारी
रात्री सुमारे साडे आठ वाजण्याच्या सुमारास, मनोहर कदम हे रस्ता ओलांडत असताना पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कदम गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, डोळ्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
विशेष म्हणजे, अपघातास कारणीभूत ठरलेली स्कॉर्पिओ ही पोलीस विभागाची असून ती सचिन तुकाराम पवार (रा. समर्थनगर, ता. अक्कलकोट) हे चालवत असल्याची माहिती फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात भरधाव व निष्काळजी वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.या अपघातामुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






















