सोलापूर – महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या 49 व्या सभापती पदी भाजपच्या रंजीता चाकोते यांची बिनविरोध निवड होणार आहे. स्थायी समितीच्या सहाव्या महिला सभापतीपदाच्या मानकरी रंजीता चाकोते या ठरणार आहेत. तर महापालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत भाजपचे पाच सभापती झाले असून सहाव्या सभापती पदी रंजीता चाकोते या विराजमान होणार आहेत.
सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1964 मध्ये झाली. महापालिकेत आर्थिक अधिकार असलेली महत्त्वपूर्ण समिती म्हणून स्थायी समितीकडे पाहिले जाते. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या समिती सभापतीकडे असतात. स्थायी समिती ही केवळ एक समिती नसून महापालिकेच्या आर्थिक, धोरणात्मक आणि विकासात्मक निर्णयांची ‘केंद्रबिंदू’ मानली जाते.
महापालिकेच्या कामकाजात स्थायी समितीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. अंदाजपत्रक मंजुरीपासून विविध विकासकामांच्या निविदा, खर्च मंजुरी, निधी वितरण, प्रशासकीय मान्यता अशा अनेक निर्णायक बाबी या समितीमार्फत पार पडतात. त्यामुळे या समितीचा सभापती म्हणजे शहराच्या विकासाच्या गतीला दिशा देणारा प्रमुख घटक ठरतो.
स्थायी समिती सभापतीपदी आतापर्यंत एकूण 48 जणांनी हे महत्त्वपूर्ण सांभाळले. सोलापूर महापालिकेत स्थायी समितीच्या पहिल्या सभापतीपदी एकनाथ तुळशीराम माने हे विराजमान झाले होते. दिनांक 1 मे 1964 ते 30 जून 1966 या कार्यकाळात त्यांनी सभापतीपद भूषविले. त्यानंतर एकूण 48 सभापतींनी कामकाज पाहिले. यामध्ये आत्तापर्यंत एकूण 5 महिलांना सभापतीपदी संधी मिळाली होती. त्यानंतर आता सहाव्या महिला सभापती पदी भाजपच्या रंजीता चाकोते यांना मान मिळत आहे.सन 2018 नंतर आठ वर्षांनी सोलापूर महापालिकेला स्थायी समितीचा चेअरमन लाभणार आहे.
दरम्यान, महापालिका स्थापनेनंतर भाजपचे एकूण पाच सभापती झाले होते. यंदा रंजीता चाकोते या भाजपच्या सहाव्या सभापती होणार आहेत. भाजपचे पहिले स्थायी समिती सभापती होण्याचा मान लिंगराज वल्याळ यांना 13 मे 1985 ते 30 एप्रिल 1986 या कालावधीत मिळाला. (स्व.) लिंगराज वल्याळ हे पुढे
भाजपचे आमदार आणि खासदार झाले होते. त्यानंतर जगदीश पाटील 5 जून 1998 ते 5 मार्च 1999, सूर्यकांत (सुरेश) पाटील 5 मार्च 1999 ते 4 मार्च 2000, प्रा. मोहिनी पतकी 4 मार्च 2000 ते 2 मार्च 2001 संजय कोळी 18 मार्च 2017 ते 1 मार्च 2018 आणि त्यानंतर आता सहाव्या सभापती पदाचा मान रंजीता चाकोते यांना मिळत आहे.
या मान्यवर महिलांनी भूषविले सभापती पद !
स्थायी समिती सभापती पदी आत्तापर्यंत एकूण 5 महिलांना संधी मिळाली आहे. तर आता सहाव्या महिला सभापती म्हणून भाजपच्या रंजिता चाकोते यांची निवड होत आहे. पहिल्या महिला सभापती पदाचा मान प्रभावती मसरे यांनी (1 मार्च 1994 ते 21 मार्च 1994 ) मिळाला होता. त्यानंतर शिवलिंगम्मा आसादे (21 मार्च 1994 ते 19 फेब्रुवारी 1996), प्रा. मोहिनी पतकी (4 मार्च 2000 ते 2 मार्च 2001), विजयाताई थोबडे (2 मार्च 2001 ते 1 मार्च 2002), हणमंती करगुळे ( 5 मार्च 2008 ते 3 मार्च 2009 ) यांनी सभापती पदाची जबाबदारी सांभाळली. आता सहाव्या सभापतीपदी रंजीता चाकोते या विराजमान होत आहेत.

























