बार्शी – येथील मायबोली सांस्कृतिक मंडळाच्यावतीने डॉ. विश्वास पटवर्धन यांच्या राशी प्रेम या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यांच्यासोबत गफार मोमीन, ललिता जगदाळे आणि प्रज्ञा गौरकर हे गायक गायिका या कार्यक्रमात सहभागी झाले होते. डॉ. पटवर्धन यांनी सिंह राशीपासून सुरुवात करुन संपूर्ण बारा राशींची सफर घडवली.
प्रत्येक राशीची वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी त्या त्या राशीच्या स्वभावाच्या माणसांचे गमतीदार किस्सेही सांगितले. त्यावेळी त्या राशीतील काही प्रसिद्ध राजकारणी, साहित्यिक, अभिनेते, अभिनेत्री यांची छायाचित्रे स्क्रीनवर दाखवण्यात आली. प्रत्येक राशीची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत सांगितल्यानंतर त्याच्याशी संबंधित असे चित्रपट गीत पडद्यावर दाखवण्यात आले. त्या गीताचे गायन सहभागी गायकांनी कराओकेवर केले. ये राते ये मौसम नदी का किनारा, ये शाम मस्तानी, निसर्ग राजा ऐक सांगते, क्या खूब लगती हो,. अशी अनेक मराठी हिंदी अवीट गोडीची गाणी यावेळी सादर करण्यात आली.
कार्यक्रमाचा प्रारंभ मायबोलीचे संस्थापक स्व.अध्यक्ष विजयकुमार माढेकर आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली यांच्या प्रतिमांचे पूजन करुन आणि दीप प्रज्वलन करुन झाला. अध्यक्ष मुकुंदराज कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सचिव डॉ. प्रशांत मोहिरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी उपाध्यक्ष जवाहर माढेकर यांनी पाहुण्यांना सन्मानित केले. आभार प्रदर्शन राजेंद्र श्रीश्रीमाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वैशाली मोहिरे आणि पल्लवी माढेकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर मायबोलीचे संचालक अरुण शहा, जितेंद्र माढेकर, सुनील आबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यंकटेश कुलकर्णी, निलेश माढेकर, स्वामी, उमेश अक्कलकोटे, दिलीप मैंदरकर, धारुरकर यांनी परिश्रम घेतले.
मोरया फंक्शन हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मायबोलीच्या रसिक सभासदांची उस्फूर्त दाद मिळाली.



























