नांदेड – लातूर या प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गाच्या उभारणीमुळे मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दळणवळणातील अडथळे दूर होऊन उद्योग, रोजगार, शिक्षण व व्यवसायाच्या संधींना मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या रेल्वे प्रकल्पाद्वारे नांदेड–लातूर तसेच नांदेड–बिदर ही महत्त्वाची शहरे एकाच मार्गाने जोडली जाणार असल्याने हा रेल्वे मार्ग भविष्यात मराठवाड्यातील जनतेचा ‘भाग्यविधाता’ ठरेल,असे चित्र दिसत आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी या अत्यंत महत्त्वपूर्ण मागणीचा जोरदार पद्धतीने पाठपुरावा केला. त्यांच्या पुढाकारामुळे सदर मार्गाच्या सर्वेक्षण व तपशील प्रकल्प अहवाल (DPR) प्रक्रियेत मोठी गती आली असून कामकाज सकारात्मक टप्प्यावर पोहोचल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे.
या रेल्वे मार्गाचा सर्वाधिक फायदा नांदेड शहरालगतची मोठी वस्ती असलेल्या विष्णुपुरी,वडेपुरी,जानापुरी,बामणी,खरबी या गावांना होणार आहे. या भागातील नागरिक दळणवळण,रोजगार व व्यापाराच्या दृष्टीने नव्या युगात प्रवेश करणार असल्याची भावना व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे,रत्नेश्वरी देवस्थान आता केंद्रीय विकासात्मक आराखड्याशी जोडले जाणार असल्याने वडेपुरी सर्कल परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भाविकांची वाढती वर्दळ,पर्यटनाचा विकास आणि स्थानिकांना मिळणाऱ्या नव्या संधी यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाची लहर निर्माण झाली आहे.
याबाबत बोलताना भाजपा चे मा. जिल्हा सचिव श्री. सदाशिव अंबुरे,समाजसेवक श्री.राजू पाटील येवले,तसेच श्री. प्रकाश पाटील दळवे,मा.सरपंच दामू पाटील,बालाजी शिंदे,तुकाराम पाटील बोडके,मोतीराम काळे व असंख्य कार्यकर्ते यांनी आनंद व्यक्त केला आहे व खासदार डॉ. अजित गोपछडे साहेबांचे आभार मानले आहे.
हा रेल्वे मार्ग म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी सुवर्णसंधी आहे. लोकांच्या अनेक दशकांच्या प्रतीक्षेला आता प्रत्यक्ष रूप मिळत आहे. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम वेगाने मार्गी लागेल आणि याचा सर्वाधिक लाभ सामान्य नागरिकांना मिळणार आहे.



















