पुन्हा बनले इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष
नवी दिल्ली, 26 (हिं.स.) : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या प्रमुखपदी काँग्रेसने पुन्हा एकदा सॅम पित्रोदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पित्रोदा यांची पुनर्नियुक्ती केली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पित्रोदा यांनी 8 मे 2024 रोजी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. किंबहुना आक्षेपार्ह विधानावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पित्रोदा यांनी आपल्या भारतीयांबद्दल वर्णभेदी टीका केली होती. पित्रोदा म्हणाले होते क, “पूर्वेकडील लोक चिनी आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने पित्रोदा यांना चांगलेच धारेवर धरले होते. यातून काँग्रेसच्या फुटीरतावादी राजकारणाचा पर्दाफाश झाल्याचा दावा भाजपने केला होता. यासोबतच भाजपने पित्रोदा यांच्या वारसा करावरील वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला होता आणि विरोधी पक्षाला हे धोरण भारतात लागू करायचे असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी काँग्रेसने स्वतःला पित्रोदांच्या विधानापासून लांब ठेवले होते. तर प्रियंका वाड्रा आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी देखील पित्रोदांचे वक्तव्य अमान्य असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पित्रोदांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.