गृहमंत्र्यांवरील आक्षेपार्ह टिप्पणीचे प्रकरण
नवी दिल्ली, 26 जून (हिं.स.) : गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे. उत्तरप्रदेशातील खासदार-आमदारांच्या विशेष न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी शुभम वर्मा यांनी आज, बुधवारी या खटल्यात पक्षकार होण्यासाठी दिलेला अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 जुलै रोजी होणार आहे
जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी 15 जुलै 2018 रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाने 27 नोव्हेंबर 2023 रोजी राहुल गांधींना सुनावणीसाठी बोलावले होते. तसेच 20 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी कोर्टात हजर झाले आणि त्यांना जामीन मिळाला. तेव्हापासून त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी खटला प्रलंबित आहे.
गेल्या 7 जून रोजी कोतवाली नगर येथील घरहा कला डिहवा येथील राम प्रताप यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून पक्षकार बनवण्याची मागणी केली होती. तक्रारदार भाजप नेते विजय मिश्रा यांचे वकील संतोष पांडे यांनी विरोध केला. राहुल गांधींच्या अवाजवी प्रभावाखाली खटला लांबवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी सुनावणी होऊन न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. कोर्टाने राहुल गांधींना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावण्याचे आदेश दिले आणि पुढील सुनावणीसाठी 2 जुलैची तारीख निश्चित केली आहे.