मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना व खा. नारायण राणेच्या सातत्याने उघडपणे होत असताना सरकारने त्यांचीच पुन्हा फेरनियुक्ती करीत त्यांना धक्का दिला आहे. इतकेच नव्हे तर सचिवपदी त्यांच्याच गटाचे सचिव सुभाष देसाई व सदस्यपदी आ. आदित्य ठाकरे यांचीही निवड करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासनाने त्याबाबत अद्यादेश काढून समितीची घोषणा केली आहे.आगामी मुंबई महापलिकेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी जाणीवपूर्वक त्यांची नियुक्ती केली असल्याचे सांगितले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली.तेव्हापासून दोन्ही गटात विस्तवही देखील जात नाही. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईतील शिवाजी पार्क येथे राष्ट्रीय स्मारक आहे. या स्मारकाच्या अध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम,खा. नारायण राणे यांनी केली होती. त्यामुळे त्यांना काढले जाईल, असे समजले जात होते. मात्र सरकारने त्यांनाच कायम ठेवले आहे. याबाबत सरकारने काढलेल्या अद्यादेश जारी केला आहे. त्यामध्ये
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्याकरीता मुंबई येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शिवाजी पार्क, दादर येथील महापौर बंगला” या जागेची निवड केली आहे. या स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार २७ सप्टेंबर, २०१६ च्या शासन निर्णयान्वये उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास आणि संस्था स्थापन करण्यात आलेली होती. मुख्यमंत्री झाल्यावर २०१९ मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. न्यासाच्या विधानपत्र आणि नियम व नियमावली मधील अ.क्र. १४ येथील तरतूदीनुसार न्यासावरील अध्यक्ष आणि इतर सदस्यांचा प्रथम नियुक्तीचा ३ वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पदसिद्ध सदस्य वगळता अध्यक्ष आणि सदस्यांची पदे भरण्याबाबतचे १३ मार्च, २०२० रोजी आदेश काढले होते. पदसिद्ध सदस्य वगळता अध्यक्ष व इतर सदस्यांची न्यासावरील ५ वर्षाची मुदत यावर्षी ११ मार्च रोजी संपली होती. सुभाष राजाराम देसाई यांनी ‘बाळासाहेब ठाकरें राष्ट्रीय स्मारक’ या नावानं सार्वजनिक न्यासाची मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० व संस्थेची सहकारी संस्था नोंदणी अधिनियम, १९६० अन्वये केलेल्या नोंदणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारनं निवड केली आहे.
या समितीमध्ये
अध्यक्षपदी -उद्धव ठाकरे
सचिव – सुभाष देसाई
सदस्य म्हणून आदित्य ठाकरे
यांच्यासह आ. पराग आळवणी
व शिंदे गटाचे शिशिर शिंदे यांचा समावेश आहे. ठाकरे पिता-पुत्र व देसाई यांची पाच वर्षाकरिता तर आळवणी व शिंदे यांची तीन वर्षाकरिता निवड करण्यात आलेली आहे.
——–
निवडीमागे मुख्यमंत्र्यांची खेळी
येत्या काही महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने कसून तयारी चालवली आहे,या परिस्थितीत या समितीवर ठाकरे यांना वगळल्यास मराठी मतदारामध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली असती आणि निवडणुकीत फटका बसू शकेल, या शक्यतेने फडणवीस यांनी ही खेळी खेळल्याचे सांगितले जात आहे.


















