सोलापूर : विभागीय कार्यालयाकडून झालेल्या शहरातील सार्वजनिक नळांच्या फेर सर्व्हेक्षणमध्ये काही नळांचा समावेश नसल्याचे आढळल्याने पुन्हा एकदा सर्व्हेक्षण करून अचूक यादी सादर करावी, असे निर्देश
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी दिले. याशिवाय स्वच्छता, सार्वजनिक सुविधा सुधारण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
महापालिका आयुक्तांनी शहराच्या अनेक भागांना भेट देऊन स्वच्छता, सार्वजनिक सुविधांची पाहणी केली
शहरातील स्वच्छता, सार्वजनिक सुविधा व पायाभूत सेवांची गुणवत्ता तपासण्यासाठी हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी श्री. विजयकुमार लोखंडे, जावेद पानगल, राघवेंद्र गायधनकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. काही महत्त्वाच्या अनियमितता व आवश्यक सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. याबाबत आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित विभागांना दिले.बुद्ध नगर फॉरेस्ट एरिया येत ड्रेनेज समस्या व साफसफाई सार्वजनिक शौचालयाच्या ड्रेनेज लाईनबाबत उपलब्ध जोडण्यांची पुनर्तपासणी करून तुंबण्याची समस्या दूर करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच परिसरातील वाढलेली झुडपे तातडीने काढून स्वच्छता करण्यास सांगितले.
सार्वजनिक नळांच्या फेर सर्व्हेक्षणमध्ये काही नळांचा समावेश नसल्याचे आढळल्याने पुन्हा एकदा सर्व्हेक्षण करून अचूक यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. अनधिकृत सार्वजनिक नळ जोड बंद करणे व रहिवाशांना वैध स्वतंत्र नळजोड देण्याची प्रक्रिया गतीने राबवण्यात यावी, अशी सूचनाही आयक्तांनी केली.
रामवाडी, गुलाबनगर, मौलाली चौक, लोधी गल्ली परिसरातील शौचालयांची पाहणी करून काही ठिकाणी भूमिगत पाण्याच्या पातळीमुळे नवीन इलेक्ट्रिक बोअर घेण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. यासाठी सर्वेक्षण करून एकत्रित यादी पुढील 7 दिवसांत सादर करण्याच्या सूचना दिल्या.
पडीक व वापरात नसलेली सार्वजनिक शौचालये पाडून टाकावीत, यासंदर्भात महापालिकेला कोणताही आर्थिक खर्च येऊ न येता, पाडकामातून मिळणाऱ्या स्क्रॅपचा मोबदला महसूल म्हणून मिळेल असा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.लोधी गल्ली, नवीन सार्वजनिक शौचालय पाण्याच्या टाकीजवळील कंपाउंड वॉललगत पुरुषांसाठी नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.अरुंद बोळीत कचरा व्यवस्थापन घंटा गाडी न पोहोचणाऱ्या अरुंद बोळ्यांमध्ये अतिरिक्त महिला कर्मचारी नेमून कचरा उचलण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना उत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व शहर स्वच्छतेसाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

























