सांगोला – आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात टिकायचे असेल तर अभ्यासाबरोबर अवांतर वाचन हे केले पाहिजे. मानवी जीवनात वाचन हा एक प्रगतीचा पाया आहे. मेंदु जागृत ठेवायचा असेल तर वाचन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा.योगेश इनामदार यांनी केले. ते फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रा.शरद आदलिंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रंथालयात सामुहिक पुस्तक वाचन, ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि व्याख्यान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल प्रा.सुधीर माळी, मोहन लिगाडे, स्वप्नील रूपनर, नेताजी मस्के, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.