सोलापूर – ग्रामीण शिक्षणावर परिणाम करणारी समूह शाळा तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना या दोन्ही योजना तात्काळ रद्द करण्याची मागणी युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांनी केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, समूह शाळा योजना ही प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क नाकारणारी असून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी आहे. पाचपेक्षा कमी विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करून त्या समूह शाळेत विलीन केल्यास वाडी-वस्तीतील मुलांना दूरवर जावे लागेल, मुलींच्या शिक्षणावरही परिणाम होईल.
शिक्षणाचा हक्क कायदा २००९ नुसार प्रत्येक वस्तीपासून चालत पोहोचता येईल अशा अंतरावर शाळा असणे बंधनकारक असून ही योजना त्याविरुद्ध आहे. संघटनेने युडायस प्लस प्रणालीत कंत्राटी शिक्षकांचा समावेश केल्यामुळे कायम शिक्षकांच्या रिक्त पदांची वास्तविक माहिती लपवली जात असल्याचे म्हटलेआहे. त्यामुळे प्रणालीत फक्त कायम शिक्षक दाखवून नियमित भरती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना ही शिक्षणाच्या गुणवत्तेवर घाला आणणारी असल्याचा आरोप करत संघटनेने ती तात्काळ बंद करून टीएआयटी उत्तीर्ण पात्र उमेदवारांची नियमित नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी प्राथमिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी अजय पवार, अश्विनी माने ,संदीप देशमुख , राजकुमार तुपसुंदर, सुनील प्रक्षाळे ,रेखा भोसले ,शितल घोडके, ज्योती नवले , ज्योती बरगे ,समीना मुल्ला या सह आदी उपस्थित होते.