नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरक्षा, पाणी हक्क, तंत्रज्ञान विकास आणि स्वावलंबन या विषयांवर ठोस भूमिका मांडली.
दहशतवादाविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’
पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा संहार करण्यात आला असल्याचे सांगताना मोदींनी हे ऑपरेशन देशाच्या संतापाची अभिव्यक्ती असल्याचे म्हटले. “सेनादलाला पूर्ण मुभा दिली होती, लक्ष्य आणि कारवाई त्यांनीच ठरवली,” असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली
सिंधू करारावर तीव्र आक्षेप
मोदींनी जाहीर केले की आता रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. “सिंधू करार अन्यायकारक आणि एकतर्फी आहे. भारताच्या नद्यांचे पाणी शत्रूच्या शेतांना जात असताना आपल्या शेतकऱ्यांना पाण्याचा अभाव आहे, हे आम्ही सहन करणार नाही. भारताच्या हक्काच्या पाण्यावर फक्त भारताचाच अधिकार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
‘मेड इन इंडिया’ चिप्स वर्षाअखेर बाजारात
तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत मोदींनी सांगितले की देशात 6 सेमीकंडक्टर युनिट्स उभारली जात आहेत आणि वर्षाअखेरीस ‘मेड इन इंडिया’ चिप्स उपलब्ध होतील. चार-पाच दशकांपूर्वी दुर्लक्षित झालेली ही कल्पना आता प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
स्वावलंबनाचा संदेश
गुलामगिरीच्या अनुभवाचा संदर्भ देत मोदींनी स्वावलंबन हे विकसित भारताचे मूळ असल्याचे अधोरेखित केले. “जितके इतरांवर अवलंबून राहाल, तितकी गुलामगिरीची शक्यता वाढते. रुपया आणि डॉलर यांचा अर्थ फक्त चलन नसतो, ती ताकद असते. स्वावलंबन कमी झाले तर ताकदही कमी होते,” असे ते म्हणाले.