तभा फ्लॅश न्यूज/अहिल्यानगर : अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने २३ व २४ जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान १९७ अवैध वाहतूक करणाऱ्या बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून १६ लाख ५७ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.
वैध विमा नसलेली वाहने, कर न भरलेली वाहने, विधीग्राह्य परवाना नसलेली वाहने, आसन क्षमतेचे उल्लंघन करणारी वाहने, चालकाची अनुज्ञप्ती नसणे, वाहन नोंदणी पुस्तिकेप्रमाणे न ठेवता बदल करण्यात आलेली वाहने, इंडिकेटर्स, लाईट, परवर्तक दिशादर्शक नसलेली वाहने, वायु प्रदुषण निवारक तरतूदीचा भंग, प्रवासी वाहनातून मालाची वाहतूक, बेकायदा प्रवासी वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र विधीग्राह्य नसलेल्या वाहनांवर पथकाने कारवाई केली आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके व सात तालुका पथकांमधील कार्यरत मोटार वाहन निरीक्षक – श्रीमती गीता शेजवळ, सुरज उबाळे, कल्पेश सूर्यवंशी, चेतन दासनूर, सुदर्शन देवढे, हनुमंत पारधी, हर्षल जगताप, विलास धूम, सोनाली शिरसाठ, प्राजक्ता खोमणे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहन व परवान्याबाबत देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित वाहतूक करावी, असे आवाहन श्री. सगरे यांनी केले आहे.