सांगोला – आपल्या सद्गुरुंना कधी आनंद वाटेल जेव्हा आपला देह प्रारब्ध आनंदाने भोगू लागतो तेव्हा त्यांना आनंद वाटतो. सद्गुरूंना प्रारब्ध चुकले नाही किंवा कुठल्याही संतांना प्रारब्ध चुकले नाही म्हणून कुठलेही कर्म करताना सद्गुरूंचे मनापासून नाम घ्या ते कायम आपल्या पाठीशी असतात, असे प्रतिपादन समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांनी केले.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ११२ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त नामसाधना मंडळ, सांगोला यांच्यातर्फे ध्यानमंदिर येथे आयोजित केलेल्या प्रवचन मालिकेत बोलत होते.
पुढे बोलताना मोहनबुवा रामदासी म्हणाले, गोंदवले या ठिकाणी गेल्यानंतर जो अनुभव येतो तोच अनुभव सांगोलाच्या ध्यानमंदिरात आला. महाराज म्हणतात त्याप्रमाणे जेथे नाम तेथे माझे प्राण असल्याचे ध्यानमंदिरात जाणवले.
महाराज ज्यांच्या हाती माळ देतात त्यांची सर्व जबाबदारी ते घेतात, तेव्हा त्यांच्यावर श्रद्धा ठेवून प्रपंच व परमार्थ करावा असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धांचे विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण समारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाले.


















