सोलापूर : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेला त्याग अतुलनीय आहे. धर्मवीर बलिदान मासामुळे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण समाजातील प्रत्येकाला होते असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवस्मारक येथे आयोजित रक्तदान शिबिरात रविवारी २७६ जणांनी रक्तदान करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली. यात सोलापूर शहरातून १७५ तर दक्षिण सोलापूर तालुक्यातून १०१ जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी दिलेली धर्माची शिकवण नव्या पिढीला माहीत व्हावी, त्यांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा हा उद्देश श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कामातून सफल होताना दिसत आहे.
छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या धर्मवीर बलिदान मासानिमित्त दरवर्षी राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत सोलापूर शहरात रक्तदान शिबिर घेण्यात आले.
याप्रसंगी डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष सतीश मालू, शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने, नगरसेवक राजकुमार पाटील, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक अक्षय अंजिखाने, नगरसेवक श्रीनिवास दायमा, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, श्रीरंग गवई, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे तसेच तळे हिप्परगा, हगलूर, उळेवाडी, उळेगाव, कासेगाव, वडजी आदी भागातील धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























