सोलापूर : दहशतवाद, परदेशी नागरिकांची घुसखोरी, अंमली पदार्थ, सायबर गुन्हे अशा सर्वच बाजूंनी सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणण्याचे काम राष्ट्राच्या शत्रूकडून होत आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षितता जपण्यासाठी भारतात समान नागरी कायद्याची आणि प्रत्येक भारतीयाने अष्टावधानी असण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित (मुंबई) यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट सोलापूर आयोजित शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन बुधवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात झाले.
व्याख्यानमालेचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रवीण दीक्षित यांनी ‘सामाजिक सुरक्षा’ या विषयावर गुंफले. प्रारंभी व्याख्यानमालेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी व्यासपीठावर मसापाच्या अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, कार्याध्यक्ष किशोर चंडक, समन्वयक ॲड. जे. जे. कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह डॉ. नरेंद्र काटीकर, शोभा बोल्ली उपस्थित होते. किशोर चंडक यांना खयाल या राष्ट्रीय संस्थेतर्फे उत्कृष्ट तिकीट संग्राहक- भारताचे वरिष्ठ सुपरस्टार हा एक लाख रुपये पारितोषिक असलेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते मानपत्र, शाल देऊन महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टतर्फे किशोर चंडक यांचा सन्मान करण्यात आला.
प्रवीण दीक्षित म्हणाले, भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका आणि जगातील अनेक देश दहशतवादाने त्रस्त आहेत. अनेक बांगलादेशी आणि इतर देशातील नागरिक भारतात बेकायदेशीरपणे राहत आहेत. ते भारतात घुसखोरी करून मतदानदेखील करत आहेत. अशा कोणत्याही सामाजिक सुरक्षा विषयीच्या संकटांबद्दल माहिती मिळाली तर नागरिकांनी सतर्क राहून संबंधित यंत्रणेला ती कळवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ११२ हे मोबाईल ॲप मोफत उपलब्ध करून दिले आहे. सामाजिक सुरक्षा ही सुरक्षा यंत्रणांसोबतच प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे, असे श्री. दीक्षित याप्रसंगी म्हणाले.
सायबर गुन्हेगारी हे भारतीय समाजासमोर निर्माण झालेले संकट आहे. शासन स्तरावर वारंवार सायबर गुन्हेगारी बाबत समाजाला जागृत करून देखील अनेक नागरिक सायबर गुन्हेगारीला बळी पडत आहेत. तंत्रज्ञानाचे युग असले तरी तंत्रज्ञान वापरताना सतर्कताही बाळगण्याची आवश्यकता आहे. वाहन खरेदी विक्री, अनोळखी व्यक्तीला भाड्याने घर देणे, संशयास्पद व्यक्तींकडून खरेदी करणे अशावेळी नागरिकांनी सावध राहून खात्री करून मगच निर्णय घेतला पाहिजे. भारताने जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न तरुण पिढीच पूर्ण करणार आहे. शासन आणि प्रशासनाने कठोर होऊन समान नागरी कायदा संपूर्ण देशात लागू करण्याची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील विचारवंतांनी याकरिता अनेकदा आग्रह धरला आहे. उत्तराखंड राज्याप्रमाणे देशातील सर्व राज्यांनी हा कायदा लागू करावा. याचे देशाच्या सामाजिक सुरक्षेवर सकारात्मकच परिणाम दिसतील, असे देखील प्रवीण दीक्षित याप्रसंगी म्हणाले.
ऍड. जे. जे. कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. प्रमुख कार्यवाह डॉ. नरेंद्र काटीकर यांनी प्रास्ताविक केले. शोभा बोल्ली यांनी मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन तर प्रा. भीमगोंडा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेत आज
शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेत आज (गुरुवारी) डॉ. रवींद्र तांबोळी (नांदेड) हे ‘विनोदाचे आत्मपर अंतरंग’ या विषयावर बोलणार आहेत. सोलापूरकरांनी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात सायंकाळी ठीक ६ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टचे कार्यवाह किशोर चंडक यांनी केले आहे.



























