सांगोला – राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार सोमवार दि.१३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता सांगोला नगर परिषदेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे सांगोला पंचायत समितीच्या सदस्य पदाचे अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यासाठी सोडत पध्दतीने कार्यक्रम घेण्यात आला. सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी राखीव जागांचे सदस्य आरक्षण सोडत जाहीर केले. यावेळी व्यासपीठावर निवडणूक निरीक्षक उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी, गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर साळुंखे उपस्थित होते. तसेच सभागृहामध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, प्रतिनिधी व इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर आरक्षण सोडतीकरिता सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयातील लहान मुले/मुली यांच्या मार्फत चिठ्ठ्या काढून जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. सांगोला पंचायत समितीसाठी एकूण १४ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये ७ महिला व ७ पुरुष या जागांचा समावेश आहे.
असे जाहीर झाले आरक्षण सोडत-
९१ महूद बु.गण-सर्वसाधारण (महिला), ९२ चिकमहूद गण- ना.मा.प्र, ९३ वाकी (शिवणे) गण-ना.मा.प्र.(महिला), ९४ एखतपूर गण-ना.मा.प्र.(महिला), ९५ वाढेगाव गण- अनुसूचित जाती (महिला), ९६ जवळा गण-सर्वसाधारण (महिला), ९७ कडलास गण-सर्वसाधारण, ९८ अजनाळे गण-अनुसूचित जाती, ९९ राजूरी गण-सर्वसाधारण, १०० नाझरा गण-सर्वसाधारण, १०१ कोळा गण-सर्वसाधारण (महिला), १०२ हातिद गण-सर्वसाधारण, १०३ सोनंद गण- सर्वसाधारण (महिला), १०४ घेरडी गण-सर्वसाधारण