करमाळा – पंचायत समितीचे सभापतीपद यंदा ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) महिला प्रवर्गासाठी राखीव ठरले असून, आरक्षण सोडत प्रक्रिया आज सोमवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृहात पार पडली. यावेळी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून अंजली मुरोड व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.
गत निवडणुकीत करमाळा तालुक्यात एकूण १० पंचायत समिती गण होते. यावेळी दोन नवीन गणांची निर्मिती झाल्याने गणांची संख्या १२ झाली आहे. नवीन गणांमुळे व गावांच्या फेरबदलामुळे अनेक इच्छुकांचे राजकीय गणित बदलले असून, पांडे जिल्हा परिषद गटातील पांडे व रावगाव या दोन्ही ठिकाणच्या अनपेक्षित आरक्षणांमुळे चर्चांना उधाण आले आहे. या आरक्षण सोडतीनंतर पंचायत समिती निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांच्या हालचालींना देखील सुरुवात झाली आहे.
जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समितीतील प्रारूप आरक्षणावर हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी १४ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे.
करमाळा तालुक्यातील पंचायत समिती गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे:-
१) रावगाव – अनुसूचित जाती, महिला
२) पांडे – अनुसूचित जाती
३) हिसरे – सर्वसाधारण
४) वीट – नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
५) कोर्टी – सर्वसाधारण
६) केत्तुर – सर्वसाधारण
७) चिखलठाण – सर्वसाधारण, महिला
८) उमरड – नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
९) जेऊर – सर्वसाधारण, महिला
१०) वांगी (१) – सर्वसाधारण, महिला
११) साडे – सर्वसाधारण
१२) केम – नागरिकांचा मागास प्रवर्ग