नवीन नांदेड – वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज झालेल्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सिडको हडको प्रभाग क्रमांक २० मधून सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या सुवर्णा बस्वदे यांना संधी मिळणार का याकडे सिडकोकरांचे लक्ष वेधले आहे.
सिडको-हडको वाघाळा प्रभाग क्रमांक २० हा मतदारसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने नांदेड शहरातील सर्वात मोठा प्रभाग मानला जातो. या प्रभागातून पाच नगरसेवक निवडून आले असून विशेष बाब म्हणजे हे पाचही नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत. आजपर्यंत दक्षिण मतदार संघात महापौरपदाचे प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
त्यामुळे या भागाला प्रथमच महापौरपदाचे प्रतिनिधित्व मिळावे, अशी भावना नागरिकांमध्ये प्रकर्षाने व्यक्त होत आहे.या निवडणूक निकालाकडे पाहता सुवर्णा बस्वदे यांनी ११,२९० मते घेऊन सर्वसाधारण महिला प्रवर्गात त्यांनी ७,५०० मतांची सर्वाधिक आघाडी मिळवली आहे.
शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमीच्या दृष्टीने सुवर्णा बस्वदे या पुण्यातील नामांकित MIT कॉलेजमधून MBA (HR) पदवीधर उच्चशिक्षित
असून त्यांनी आदित्य बिर्ला ग्रुप या अग्रगण्य औद्योगिक समूहात उच्च पदावर कार्य केले आहे.
त्यांच्या कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमीही उल्लेखनीय आहे. पती सतीश बस्वदे हे गेल्या १२ वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय
आहेत. या सर्व बाबींचा विचार करता सुवर्ण बस्वदे यांना महापौर पदाचा बहुमान मिळेल का याकडे सिडको करांचे लक्ष लागले आहे.
























