करमाळा – तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर झाले असून यावेळी मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्यावेळी तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट होते, मात्र यावेळी चिकलठाण हा नवीन गट तयार झाल्याने करमाळा तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद गटांची निर्मिती झाली आहे.
यावेळी अनुसूचित जातीसाठी एकही गट आरक्षित नाही, जे गत निवडणुकीतील तीन जागांच्या तुलनेत मोठा बदल मानला जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. सहा पैकी पाच जागा महिलांसाठी आरक्षित असून, केवळ चिकलठाण गट सर्वसाधारण ठेवण्यात आला आहे. या गटातून पुरुष किंवा महिला कोणालाही संधी मिळू शकते. त्यामुळे या वेळी महिलांचा दबदबा स्पष्टपणे जाणवतो आहे.
मागील निवडणुकीत कोर्टी गटातून सवितराजे भोसले, विट गटातून लक्ष्मी आवटे आणि पांडे गटातून राणी वारे या महिला उमेदवार जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आलेल्या होत्या. यावेळीही या जागा सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने त्या पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
करमाळा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे:-
१) पांडे – सर्वसाधारण महिला
२) वीट – सर्वसाधारण महिला
३) कोर्टी – सर्वसाधारण महिला
४) चिकलठाण – सर्वसाधारण
५) वांगी – सर्वसाधारण महिला
६) केम – ओबीसी महिला