लातूर / उदगीर : उदगीर व जळकोट शहरात गेल्या वर्षभरापासून अत्याधुनिक बस स्थानकाचे काम सुरू असून यामध्ये राहिलेल्या सुविधा व उदगीर व जळकोट मतदार संघात ये – जा करणाऱ्या महामंडळाच्या एस.टी. बसेसची कमतरता आदीसह राहिलेले उर्वरित प्रश्न तात्काळ सोडून उदगीर व जळकोट मतदार संघातील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी काल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मंत्रालयात भेट घेऊन मागणी केली. आमदार संजय बनसोडे यांच्या मागणीचा विचार करून मतदारसंघातील बस स्थानक व उर्वरित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे आश्वासन परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहे.
उदगीर मतदार संघ हा तीन राज्याच्या सीमेवर असल्याने येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. महामंडळाच्या उपलब्ध असणाऱ्या बसेस ह्या कमी पडत आहेत तर काही बसेस नादुरुस्त व काही मोडकळीस आले असल्याने या भागातील प्रवाशांना प्रवास करताना अडचण निर्माण होत आहे. उदगीर व जळकोट शहरात बस स्थानकाचे काम सुरू असून त्या कामाचा आढावा घेऊन उर्वरित काही कामांना निधी उपलब्ध करून देवुन मतदार संघातील उदगीर व जळकोट येथे नविन बसेस उपलब्ध करुन द्याव्यात.
जळकोट शहरातील बस स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असुन या पुतळ्याच्या चबुतराऱ्याचे काम चालु आहे. मात्र पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी जागा कमी पडत आहे. यासाठी बस स्थानकातील पुतळ्याच्या जागा वाढवून त्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात यावे यासाठी शासन स्तरावरून मदत करावी अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे.




















