सध्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची चर्चा आहे. या संमेलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना अत्यंत मोलाचा सल्ला दिला. ‘मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार एकमेकांसोबत त्या अदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना दिला.
अभिनेते दीपक करंजीकर यांनी ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यात बोलताना राज ठाकरे म्हणाले, पूर्वीच्या काळी मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत अनेक सुपरस्टार होते. मात्र आता केवळ कलाकार राहिलेले आहेत. मराठी कालाकार एकमेकांशी बोलताना टोपण नावाने किंवा शॉर्ट नावाने हाक मारतो. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही तर प्रेक्षक तुम्हाला मान कसा देतील, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच एकमेकांना मान दिला तर मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत आणि ज्येष्ठ संगीतकार इलाय राजा यांचे उदाहरण देत ते सार्वजनिक ठिकाणी बोलताना एकमेकांना सर म्हणून संबोधतात असेही ठाकरे म्हणाले.