सोलापूर – बाराव्या शतकात सोन्नलगी शिवयोगी सिध्देश्वर महाराज यांनी विरेश गणपती कुंभारी, बेनक गणपती होटगी, धुळीमहंकाळ गणपती रेवणसिध्देश्वर मंदिर, कारीगण गणपती देगाव, विरकर गणपती सम्राट चौक , विरकोलाहल गणपती भोगाव , मश्रूम गणपती तळे हिप्परगा व कामेश्वर गणपती शेळगी सोलापूर याठिकाणी अष्टविनायक मंदिराची उभारणी केली.
यामध्ये नऊशे वर्षांपूर्वी श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक मंदिरापैकी दुसरे गणपती मंदिर म्हणजे होटगी येथील श्री बेनक गणपती मंदिर ! या मंदिराचे जीर्णोध्दार करण्यात येत असून यासाठी कर्नाटक येथील गोकाकमधील मूर्ती साहीत्य आणण्यात आले आहे. होटगीमधील गणपती भक्तांकडून होटगी येथील कुंभारी रोडवर भव्य आणि आकर्षक गणपती मंदिर उभारणी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
यासाठी होटगीसह परीसरातील भक्तांकडून सढळ हाताने आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी होटगी मठाचे मठाधिपती व काशी पीठाचे जगदगुरू डाॅ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने मल्लिकार्जून मातनाळे, मल्लिनाथ चिवडशेट्टी, सचिन व्हनमाने, मल्लिकार्जून कोणदे, शिवानंद हुडे व सिध्देश्वर पाटील आदींसह इतर भक्तगण मंदिर जीर्णोध्दारासाठी कार्यरत आहेत.
यासाठी परराज्यातून कलाकार व मूर्तीसाहीत्य आणण्यात आले असल्याने मंदिराचे खर्च वाढत आहे. तरी सर्व भक्तांनी बेनक गणपती मंदिर उभारणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात येत आहे.

















