धाराशिव – पोलीस वर्दी अंगावर असताना महिलेला मारहाण तर केलीच. मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्या वर्दीचा अहंपणाची मानसिकता गेलेली नसल्यामुळे पुन्हा त्या महिलेला एकटे गाठून त्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यासह त्याच्या नातेवाईकांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने दि.१५ फेब्रुवारी रोजी बेदम मारहाण केली. तसेच तुला खल्लास करून टाकतो अशी धमकी देत लाकडे व कुऱ्हाडी घेऊन अंगावर येत आहेत.
याची तक्रार पोलीस ठाण्यात जाऊन केली. मात्र, त्या पोलिसांशी संगणमत करून संबंधित बीट अंमलदार व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी तक्रार घेणे तर सोडाच साधी विचारपूस देखील केली नाही. उलट, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून त्या महिलेला पोलीस ठाण्यातून हाकलून देण्याचे काम केले. त्यामुळे त्या पिडीत महिलेने घटनेच्या पाचव्या दिवशी आपल्या मुलासह पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची भेट घेऊन आपबिती कथन केली. यावेळी खोखर यांनी संबंधित महिलेला न्याय देऊ असा धीर दि.२० फेब्रुवारी रोजी दिला.
तुळजापूर तालुक्यातील चिकणी तांडा येथे बेबी विनायक राठोड या नवरा व मुलांसोबत गेल्या ७ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, तेथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी खुबा निलाप्पा चव्हाण, सागर खुबा चव्हाण, शारदाबाई खुबा चव्हाण, राजू निलप्पा चव्हाण व रमेश निलाप्पा चव्हाण यांनी त्या घरी एकटी असताना दि.१५ फेब्रुवारी रोजी नाहक त्रास देऊन अंगावरील कपडे वाडीत, पोटावर व नदीवर पाय देत मारहाण केली. त्यामुळे राठोड यांनी नळदूर्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या.
मात्र, आजपर्यंत त्यांची तक्रार घेतली नाही किंवा संबंधितांना साधी विचारणा देखील केली नाही. तसेच संबंधित चव्हाण यांच्यासह परीवारांकडून सतत मारहाण करण्यात येत असून तुला खल्लास करून टाकतो अशा धमक्या देत आहेत. तसेच लाकडे व कुऱ्हाड घेऊन अंगावर येत आहेत. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतू, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून संगणमताने तक्रार नोंदवून घेऊ देत नसल्याचा गंभीर आरोपही केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी.
तसेच महिलेला होत असलेला त्रास थांबवावा, अशी मागणी राठोड यांनी केली आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक महिला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महिला असताना देखील जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचे प्रमुख महिलांना न्याय देण्यासाठी कारवाई का करीत नाहीत ? त्यामुळे पोलीस अधीक्षक खोखर या प्रकरणी न्याय देतात की नाही ? याकडे लक्ष लागले आहे.























