बिलोली / नांदेड – संस्कृती संवर्धन मंडळ, शारदानगर सगरोळी संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी येथील इयत्ता १० वी २००४ व १२ वी २००६ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल २१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रमोदजी देशमुख, चेअरमन – संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शालेय जीवनाचे महत्त्व, शिस्त व मूल्यांची जपणूक याबाबत मोलाचे विचार व्यक्त केले. या स्नेहमिलन प्रसंगी शाळेतील माजी गुरुजन कोकंडकर, पेटकर, आकाश शिंदे सर, डी. जी. बामणे, यू. डी. शिंदे सर, विभुते, वट्टमवार, आलुरकर, गायकवाड व ओतारी यांचा सन्मान करण्यात आला.
गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना अनेक विद्यार्थी भावूक झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर फुलारी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. या स्नेहमिलन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष उलगडे, नागेश माचपुरे, नंदलाल वाघमारे, शिवशंकर पाटील, यालमलवार पोशट्टी व विनोद शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे हा स्नेहमिलन सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी भविष्यातही अशा प्रकारचे स्नेहमिलन उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.


























