अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार टीका केली.”एका माणसाला मला उत्तर द्यायचं आहे. आपण त्याला इथून निवडून दिला. त्याने मांडव्यात एक प्रश्न विचारला. म्हणाला 70 -75 वर्षात जेवढा विकास झाला, तो मी पाच वर्षात केला. मी फक्त त्याला उत्तर देतो. दादांच्या सांगण्यावरुन लोकांनी एका रात्रीत तुला आमदार केला. आता तुझं पार्सल एका रात्रीत माघारी बीडला पाठवायचय”, अशी टीका मोहिते पाटील यांनी केली होती.
या टीकेला आता आमदार राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिले. “मी याला टीका म्हणणार नाही, ही धमकी समजतो मी. ती धमकी एका गरिबाच्या मुलाला धनदांडग्यांनी दिली आहे. गरीब घरात जन्माला आलो ही आमची चूक आहे का?, असा पलटवार राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केला आहे. ‘ही निवडणूक मोदीजींची निवडणूक आहे, मोदीजींच्या निवडणुकीत जनता सोबत आहे, कोणी कुठेही गेलं तरी जनता मोदींसोबत आहे. माळशीरस तालुक्याची जनताही मोदींसोबत राहिलं, असंही सातपुते म्हणाले.