मंगळवेढा – कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.. येथे शनिवार दि.08/11/2025 रोजी रस्ते सुरक्षा अभियान संपन्न झाले. त्यावेळी बोलताना कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक म्हणाले की महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नुकताच सुरु झाला आहे. “रस्ते सुरक्षा अभियान” हे रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी राबवले जाणारे एक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अभियान आहे. या अभियानांतर्गत वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि कारखाना प्रशासन एकत्र काम करतात. याचा मुख्य उद्देश वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हा आहे.
रस्ते अपघाताविषयी माहिती देताना मंगळवेढ्याचे पोलीस उपनिरिक्षक विजय पिसे यांनी अपघात टाळणेसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने ऊस वाहतुकीचे वाहनावर पाठीमागे, नमुन्यातील चार बाय चार फुटाचे रिफ्लेक्टर बोर्ड लावावेत. वाहन चालविताना मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर लावु नये, ओव्हरलोड वाहतुक करु नये, ऊसाने भरलेली वाहने पुढे नेण्यासाठी स्पर्धा करु नये. रस्तावर वाहन नादुरुस्त झाल्यास पुढे व पाठीमागे रिफ्लेक्टीव्ह कोन लावुन घ्यावेत. वाहन दुरुस्त झाल्यावर लावलेले दगड उटी रस्त्यावरुन बाजुला काढावीत. आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने, निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवु नये. चालकाकडे योग्य ते लायसन्स असणे गरजेचे आहे. भरलेल्या किंवा रिकाम्या वाहनाला दोनपेक्षा जास्त टेलर जोडु नये. शहरातील मुख्य रस्त्याचा वापर न करता बाह्यवळण रस्ताचा वापर करावा. रात्रीचे वेळी पाठीमागील बाजुस लाल रंगाचा टेल लँप दिवा लावावा. टेलरला दोन्ही बाजुस लाल, पिवळा व पांढऱ्या रंगाचे रिफ्लेक्टर टेप लावावेत जेणेकरुन वाहन वळण घेत असताना पुढील किंवा मागील वाहनास सुचना मिळेल. अशा मार्गदर्शक सुचना दिल्या.
टेपरेकॉर्डर लावुन वाहन चालवणे, कोणत्याही प्रकारची नशा करुन वाहन चालविणे असे आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल अशा सुचनाही त्यांनी या वेळी दिल्या. तसेच रस्ते वाहतुकीचे नियमही सर्व उपस्थित वाहन चालकांना समजावुन सांगितले. सदर प्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे, पोलीस उपनिरिक्षक विजय पिस, पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी यादव, पोलीस कॉन्स्टेबल युवराज साळुंखे, तोडणी-वाहतुक ठेकेदार यांचे हस्ते ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावणेत आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे व आभार ई.डी.पी मॅनेजर अभिजीत यादव यांनी मानले.
युटोपियन शुगर्स लि. येथे रस्ते सुरक्षा अभियान कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक, मुख्य शेती अधिकारी धनंजय व्यवहारे, पोलीस उपनिरिक्षक विजय पिस, पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी यादव, पोलीस कॉन्स्टेबल युवराज साळुंखे व तोडणी-वाहतुक ठेकेदार.


















