माळीनगर – संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील माळीनगर गट नंबर दोन नजीक असलेल्या जाधववाडा हॉटेल समोर जिल्हा युवा सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, युवा सेना उपतालुकाप्रमुख दत्ता साळुंखे यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पालखी महामार्गावरील माळीनगरहून पंढरपूर व टेंभुर्णी कडे जाणा-या चौकात, तसेच अकलूज अकलाइ जवळील नीरा नदीवरून पुणे कडे जाणा-या चौकात स्पिड ब्रेकर बसवावेत. माळीनगर कारखाना लगत सर्व्हिस रोडवरील अनावश्यक स्पिड ब्रेकर कमी करावेत. शेतक-यांचे राहिलेले अतिवृष्टिचे पैसे तातडीने द्यावेत. या मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई टोणपे, मोडनिंब शहर प्रमुख रेखा भाडे, शिवसैनिक लक्ष्मी जाडकर,उपस्थित होत्या. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे धाराशिव सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संघटनेचे अमोल शेठ जगदाळे यांनी रस्ता रोकोला पाठिंबा दिला.
शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे जर सरकारने पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा न केल्यास कृषी मंत्री भरणे मामा यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी दिला.
महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशा टोणपे म्हणाल्या माळशिरस तालुक्यातील खासदार, आमदार शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचे पैसे देणे बाबत का पाठपुरावा करत नाही याचे आश्चर्य वाटते. स्पीड ब्रेकर नसल्यामुळे दोन्ही चौकात आत्तापर्यंत चार जणांचे बळी गेले तरीही महामार्ग प्रशासन आणि नेते मंडळींना का जाग येत नाही असा प्रश्न त्यांनी केला.
यावेळी युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे गणेश कदम, संजय पोळ, सचिन भोसले, पोपट जमदाडे, धनाजी मस्के, रज्जाक मुलाणी, आप्पा महाडिक, पप्पू पाटील, अशोक चव्हाण, सचिन मिसाळ, ओम पराडे, विकास भोई, प्रशांत पराडे, अक्षय पराडे, दयानंद इंगळे, रोहित इंगळे, किरण पराडे, गणेश काळे, गोरख पराडे बंशीलाल भोई, शुभम भोई, मुकुंद गायकवाड इ उपस्थित होते.
यावेळी पालखी महामार्गाचे गुणप्रत अधिकारी अक्षय शिंदे यांनी निवेदन स्वीकारून आठ दिवसात दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि माळीनगर मधील अनावश्यक स्पीड ब्रेकर काढू असे आश्वासन आंदोलकांना दिले. आश्वासन पूर्ण न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा गणेश इंगळे यांनी यावेळी जाहीर भाषणात दिला. यावेळी अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन तातडीने संपवावे यासाठी आंदोलन प्रमुखांना पोलीस वारंवार सूचना देत होते. आंदोलन संपल्यानंतर दोन्ही बाजूला खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस परिश्रम घेत होते.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग अकलूज आणि टेंभुर्णी फाटा जंक्शनवर स्पीड ब्रेकर बसवावेत तसेच अद्याप शेकडो शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही ते तातडीने द्यावे या मागण्यासाठी जिल्हा युवा सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
















