मुंबई : रोहित आर्याने आम्हाला ओलीस धरल्यानंतर कोणतेही जबरदस्ती केली नव्हती. तो माझी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करावयाची आहे, असे वारंवार सांगत होता, अशी माहिती या थरारक घटनेतील एक बळीत असलेल्या रोहन अहिरे या तरुणाने सांगितले.
वेब सिरीजच्या कामासाठी आर्याला अहिरे हा सहकार्य करत होता,मात्र त्याने 17 मुले, आजीसह त्यालाही काही तास बंदी बनविले होते.
पोलिसांच्या सांगण्यावरून त्याने शिर्डीच्या हॉलचा काचेचा दरवाजा दगड मारून फोडला होता. त्यामध्ये त्याच्या हातालाही दुखापत झाली आहे.
गुरुवारी मुंबईतील पवई इथं महावीर क्लासिक इमारतीत 17 शाळकरी मुलांना रोहित आर्य यानं ओलीस ठेवलं होतं. मुलांची सुटका करताना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्या या माथेफिरूचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. आरोपी रोहित आर्य हा मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत असताना सहायक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी त्याच्यावर गोळी झाडली, असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्परता दाखवत खिडकीतून घुसत मुलांची सुखरुप सुटका केली. मात्र या प्रकरणानंतर काँग्रेसनं याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडं घटना नेमकी कशी घडली, याबाबत ओलिसांनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे.
अहिरे म्हणाला, २०१२-१३पासून मी काही वर्षे रोहित समवेत काम केले होते. त्याच्या एका चित्रपटाचे लाँचिग 2014मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी करण्यात आले होते. त्यानंतर 5,6 वर्षे आम्ही संपर्कात नव्हतो, 2,3 महिन्यापूर्वी त्याने वेबसिरीज बनवत असल्याचे सांगून त्यासाठी साही मागितले होते त्यानुसार आपण त्याच्या समवेत काम करत होतो. मात्र कालच्या घटनेपर्यंत तू असे काही करणार आहे याची आम्हाला थोडीही कल्पना नव्हती. त्याने आम्हाला बंदी बनवल्यानंतर त्याचा डाव लक्षात आला. तो पोलिसांशी बोलत असताना मी त्याला पुण्यातील एका आमदाराशी संपर्क साधून देतो, असे म्हणाले असता त्याने मला अडविले मला दीपक केसरकर यांच्याशीच बोलायचे आहे, त्यांनी माझे खूप नुकसान केले आहे. तू आत जा तुला माहित नाही, असे दडवल्याचे त्याने सांगितले.तर एक आजी म्हणाल्या
“माझ्या नातीची शूटींग होती, म्हणून दररोज इथं यायची. 26 ऑक्टोबरपासून मी तिला घेऊन येत होते. यानंतर आम्हाला पहिल्या मजल्यावर बसवले. थोड्या वेळानं दंगा झाला म्हणून आम्हाला शंका आली. मुलांना कोंडून ठेवलंय हे कळल्यावर सगळेच घाबरले आणि रडायला लागले,” तर “तळ मजल्यावर स्टोडीओमध्ये मोठमोठ्यानं आवाज येत होता. आम्हांला वाटलं की शूटींग सुरू असेल म्हणून दरवाजा बंद केला असावा. पण खालून रडण्याचा आवाज आल्यानंतर माझ्या आजीला कळलं की, काहीतरी झालं आहे. मग माझ्या आजीनं माझ्या आईला कॉल केला. नंतर पोलीस आले,” असा अनुभव शूटींगसाठी गेलेल्या एका मुलीनं सांगितला आहे.
———
घटनेला सरकार जबाबदार आहे, काँग्रेसची टीका : दुसरीकडं “रोहित आर्यनं केलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. मुलांना ओलीस ठेवलं याला राज्य सरकार जबाबदार आहे, सरकारनं त्याचं म्हणणं काय आहे, ऐकलं पाहिजे होतं. त्यामुळं या घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे,” अशी प्रतिक्रिया खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली आहे. तर “रोहित आर्य कोण आहे? ऑडिशनसाठी ज्याच्याकडं आपण पाठवतोय, ती व्यक्ती कोण आहे? याची खातरजमा करुन पालकांनी मुलांना शूटींगसाठी पाठवलं पाहिजे. पालकांनी मुलांची काळजी घ्यायला हवी होती, पण तसं झाले नाही,” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे.



















