बार्शी – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण अध्यक्ष श्री. मनोज एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर श्री. पी. पी. पेठकर यांचे सहकार्याने, बार्शी तालुका न्यायालयात ‘फिरते विधी सेवा तथा लोकअदालत’ ही विशेष मोहीम दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी उपळे दुमाला, दि. २८ ऑक्टोबर रोजी सुर्डी व दि. २९ ऑक्टोबर रोजी चिखर्डी, ता बार्शी येथे अनुक्रमे आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश १ श्री. व्ही. के. मांडे, बार्शी यांनी दिली.
या मोहिमेअंतर्गत बार्शी येथील न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे, तडजोडपात्र प्रकरणे या मोहिमेद्वारे निकाली काढण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत न्यायालयातील प्रलंबित असलेली तडजोड पात्र प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत.
तालुका न्यायालय बार्शी येथील ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत व ती प्रकरणे मध्यस्थीअंतर्गत तडजोडीने मिटावीत अशी ज्यांची इच्छा आहे अशा पक्षकारांची दि. २७ ऑक्टोबर रोजी उपळे दुमाला, दि. २८ रोजी सुर्डी व दिनांक २९ रोजी चिखर्डी, ता बार्शी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यात संबंधित पक्षकार प्रत्यक्ष अथवा आभासी पध्दतीने यात सहभागी होऊ शकतात.
न्यायालयामध्ये बरेच खटले प्रलंबित आहे. अशी प्रकरणे ‘या विशेष मोहिमेच्या माध्यमातुन तडजोडीने मिटविता येतील. त्यामुळे पैसा, श्रम आणि वेळेचीही बचत होते. मध्यस्थी मोहिमेच्या माध्यमातून सुलभ, जलद न्याय मिळतो. तडजोडीसाठी पक्षकार यांनी तालुका विधी सेवा समिती, बार्शी जि. सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष श्री. व्ही. के. मांडे यांनी केले आहे.



















