राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) प्रमुखपदी महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलीय. यासोबतच पीयूष आनंद यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) महासंचालक आणि राजीव कुमार शर्मा यांची पोलिस संशोधन व विकास ब्युरोच्या (बीपीआरडी) महासंचाल म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
सदानंद वसंत दाते आणि राजीव कुमार शर्मा हे भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) 1990 आणि पीयूष आनंद हे 1991 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्याच्या तीन प्रमुखांच्या निवृत्तीनंतर हे तिन्ही अधिकारी आगामी 31 मार्च रोजी पदभार स्वीकारतील. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए), नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ) आणि ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआरडी) यांच्या नवीन प्रमुखांच्या नियुक्तीला मंजुरी दिल्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयाने बुधवारी सांगितले.