सोलापूर – अल्पसंख्य, वंचित तसेच परीघाबाहेरील समाज घटकांच्या जगण्यातील अगतिकता, कोंडमारा व त्यांच्याकडे पाहण्याचा समाज, शासन-प्रशासनाचा दृष्टिकोन यांचं यथार्थ चित्रण उभे करणारे तरुण लेखक म्हणून साहिल कबीर यांची ओळख आहे. त्यांना यंदाचा “प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सामाजिक कृतज्ञता स्मृती सन्मान -2025 “जाहीर झाला आहे.
२३ नोव्हेंबर २०२५ला झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी निवड समितीचे पदाधिकारी डॉ. मुस्तजीब खान , डॉ. युसूफ बेन्नूर, कलीम अज़ीम, सरफराज अहमद, प्राचार्य फारुख शेख, रेणुका कड, उल्हास वेदपाठक इत्यादी हजर होते.
या स्मृती सन्मानाचे स्वरूप पंधरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि प्रा. बेन्नूर यांच्या पुस्तकांचा संग्रह असे असेल.
कुरुंदवाड येथील रहिवासी असलेले साहिल कबीर महाराष्ट्रातील प्रतिथयश कवी आहेत. ललित लेखक, कथाकार व नाट्यलेखक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांच्या कविता विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यांची एकूण ५ पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यात ‘फॉर्मलेस’ (२०१७), ‘सविनय अस्वस्थ’ (२०१८), ‘कथागत’ (२०१९) ‘मी जयूराणा’ (२०२२) ‘सोलोकोरस’ (लघु कथन संग्रह) (२०२२) ‘फ्यूजनकन्फ़युजन’ (कवितासंग्रह) २०२५ इत्यादी.
त्यांचा मराठी मुस्लिम समाजाची गेल्या ३० वर्षातील मानसिकतेविषयीचा रिपोर्ताज (महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील भागातून मुलाखती) लवकरच प्रकाशित होत आहे. ‘मुक्तशब्द’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’, ‘सत्याग्रही विचारधारा’, ‘साधना’ वगैरे नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा, कविता, लेख व स्फुटलेखन प्रकाशित झालेले आहे. तसंच ते वृत्तपत्रांमध्येही स्तंभलेखन करतात.
‘कल्चरल इनइक्वालिटी’ (लेखक : निळू दामले) पुस्तकासाठी दक्षिण महाराष्ट्रातील मुस्लिम वंचित अल्पसंख्य संदर्भात ग्रामीण भागातील एकंदर बदलांचा धांडोळा घेणारे लेखन सहकार्य त्यांनी केलं आहे.
लेखनाशिवाय ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. सांगली, कुंरदवाड परिसरातील स्थानिक युवकांमध्ये जाणिव-जागृतिसाठी सातत्याने काम करतात. मिरज दंगल, कोल्हापूर महापूर, कोविड साथीचा प्रकोप अशा संकटकालीन काळात तरुणांसमवेत फूड चेन सारख्या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनात सहभाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे विशाळगड आणि सातत्याने घडवल्या जाणाऱ्या भयप्रद स्थितीविषयक सत्यशोधन अहवाल, आंतरधार्मिक सहसंवाद इत्यादी उपक्रम ते राबवितात.
त्यांनी ‘मिट्टी’, ‘नो वन कील थॉट्स’ या शॉर्ट फिल्म्स तयार केलेल्या आहेत. या फिल्सना राज्य पुरस्कार लाभलेले आहेत. शिवाय ‘नाळबंध’ या लघुपटाचे लेखन व त्यात अभिनयही त्यांनी केला आहे.
व्यवसायाने शिक्षक असून स्पीड एज्यूकेशन इन्स्टिट्यूट ही महाविद्यालयीन विद्यार्थींसाठी खाजगी कोचिंग संस्था चालवितात. सूत्रसंचालन व निवेदन त्यांची आवड आहे. कंटेंट रायटिंग आणि व्हॉईस ओव्हरमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. त्यांना राज्यातील अनेक संस्था-संघटनांचे विविध सन्मान व पुरस्कार लाभलेले आहेत.
निवड समिती साहिल कबीर यांच्या सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे. अशा हरहुन्नरी कलावंताला हा सन्मान देण्याचं समितीने सर्वसंमतीने निश्चित केलं आहे. त्यांना हा सन्मान लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. त्याविषयीची स्वतंत्र घोषणा होईल, असे समितीकडून या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.



















