मंगळवेढा – भालेवाडी फाटा येथे शेतात सालगडी म्हणून राहिलेल्या पंडीत काशिनाथ शिंदे वय 63 रा.आंधळगाव याने दारूच्या आहारी जावून लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली असून याची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिस सूत्रानी दिलेली माहिती अशी,यातील खबर देणारे साहेबराव फराटे रा.भालेवाडी फाटा यांच्या शेतात मयत पंडीत शिंदे याला सालाने ठेवले होते. त्याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो नेहमी दारू पित असे. दि.19 रोजी सायं.5 वाजता मयत याने आंधळगाव येथे घरी जातो असे सांगून तो गेला. रात्री 8 च्या दरम्यान मयत याने खबर देणार्याच्या मोबाईल नंबरवर फोन करून मी दारू पिलो आहे. सोलापूरला जात नाही.
गेलो तर सकाळी जाईन. सोलापूरात माझे कोण नाही. माझी मुले आंधळगावात आहेत असे बडबडत होता. दि.20 रोजी दुपारी 1.30 वाजता मयत याने पुन्हा खबर देणार्याच्या मोबाईलवर फोन केला व तो म्हणाला की माझ्या वडीलानी जेथे फास घेवून मेले आहेत तेथे जावून मी फास घेणार आहे असे बडबडला. त्यावेळी खबर देणार्यानी तू तुझ्या घरच्यांना सांग. मला सांगू नको असे खबर देणारे म्हणाले. तदनंतर घडला प्रकार खबर देणारे यांनी मयताची मुलगी वर्षा हीस सांगितला.
दि.23 रोजी सकाळी 9.30 वाजता खबर देणार्याचा पुतन्या अमित फराटे याने कॉल करून सांगितले की पंडीत शिंदे याने माझ्या तळसंगी गावच्या शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. त्यानंतर पोलिस पाटील व शेतकरी घटनेच्या ठिकाणी गेले असता लिंबाच्या झाडाला मयत पंडीत शिंदे याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचे दिसून आल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.


















