लातूर / उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १९ वर्षाखालील मुलींचा संघ राज्य बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम आला आहे. यामुळे लातूर विभागाला राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलींनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
अहिल्यानगर येथे मंगळवारी खेळविण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १९ वर्षीय मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. समर्थ विद्यालयाच्या संघाने अंतिम सामन्यात बलाढ्य अशा मुंबई संघाचा पराभव करून हे सुवर्ण यश प्राप्त केले आहे.
कप्तान मृणाल पोतदार हिने उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली. तर नुपूर मलवाड, राजनंदनी लोहिया, समीक्षा मटके व प्रगती इंगळे यांनी तिला मोलाची साथ दिली. या यशाबद्दल खेळाडू व क्रीडा शिक्षक किरण हाळीघोंगडे यांचे माजी मंत्री आ. संजय बनसोडे, जि. प. लातूर चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, कृष्णा केंद्रे, चंद्रकांत लोदगीकर, तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंडे, संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, खेळाडूंचे प्रशिक्षक नितीन पोतदार, पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रयास चौधरी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, रसूल पठाण यांच्या सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.




















