सोलापूर : समतादूत हे शासन, सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचविणारे महत्त्वाचे दुवे आहेत. त्यांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे प्रभावी वाहक म्हणून काम करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने दि. १९ व २० जानेवारी २०२६ रोजी क्रांतीभूमी महाड, रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात समतादूत व प्रकल्प अधिकाऱ्यांची दोनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे डॉ. कांबळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक विशाल लोंढे, विस्तार व सेवा विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, लेखाधिकारी नितीन चव्हाण आदी उपस्थित होते. समतादूत ॲपच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावी होईल, असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.
महासंचालक सुनील वारे यांनी महाडच्या क्रांतिकारी परंपरेचा उल्लेख करत समतादुतांनी नवे ज्ञान व कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन केले. कार्यशाळेत राज्यभरातील ३०० समतादूत व प्रकल्प अधिकारी सहभागी झाले असून, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समतादूत विभागाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्वी सोनवणे, राजश्री कांबळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाडचे व्यवस्थापक प्रकाश जमदाडे, माहिती जनसंपर्क अधिकारी लिना कांबळे, यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात यांनी केले. आभार रामदास लोखंडे यांनी मानले.























