मंगळवेढा – मंगळवेढा तालुका समविचारी आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक युवक नेते सिध्देश्वर आवताडे यांचे संपर्क कार्यालयात उत्साहात पार पडली. आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकत्रितपणे लढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे,सरकार महर्षी बबनराव आवताडे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, भगीरथ भालके, दामाजी शुगरचे संचालक सिध्देश्वर आवताडे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, राष्ट्रवादी शरदपवार गट तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले, रामभाऊ वाकडे, अँड.राहुल घुले, मुरलीधर सरकळे, सोमनाथ माळी, प्रतिक किल्लेदार, सोमनाथ बुरजे, प्रशांत गायकवाड, यांचेसह विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचे अध्यक्षस्थान आघाडीचे प्रमुख सरकार महर्षी बबनराव आवताडे यांनी भूषविले. यावेळी सर्व वक्त्यांनी एकमुखाने मत व्यक्त केले की, मंगळवेढा तालुक्यात जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काम करणारी, विकासाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त सत्ता निर्माण करण्यासाठी सर्व समविचारी घटकांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.
बैठकीदरम्यान मंगळवेढा नगरपरिषद निवडणूक लक्षात घेऊन प्रभागनिहाय आढावा, संभाव्य उमेदवारांची चर्चा, तसेच प्रचाराची प्रारंभिक रूपरेषा ठरविण्यात आली. याशिवाय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये देखील एकच पॅनेल, एकच धोरण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत बोलताना काही वक्त्यांनी सांगितले की, “मंगळवेढ्यात विकासाच्या नावाखाली केवळ राजकारण झाले, प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष दिले नाही. आता बदलाची वेळ आली आहे. युवक, शेतकरी, महिला व कामगार यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी सत्ता आणण्यासाठी समविचारी आघाडी पुढाकार घेईल.”
या बैठकीत आघाडीच्या कार्यकारिणीची प्राथमिक रचना, प्रचार समिती तसेच संवाद व समन्वय समिती स्थापन करण्यात आली. पुढील काही दिवसांत गावनिहाय बैठका घेऊन जनतेचा अभिप्राय जाणून घेण्याचे ठरले.
बैठकीच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने “एकता, विकास आणि परिवर्तन” या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले.माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक नेते, महिला प्रतिनिधी तसेच तालुक्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























