माहूर / नांदेड – माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक आणि कडक कारवाईचा बडगा उचलला असून,दोन दिवसांत वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली आणि मुरुमाची वाहतूक करणारा हायवा पकडत तीन मोठ्या कारवाया केल्याने गौण खनिज तस्करांमध्ये खळबळ माजली आहे.
माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातील पाचही वाळू घाटाच्या लिलावात कोणत्याही ठेकेदाराने वाळूची बोली बोलून महसूल न भरल्याने तहसील प्रशासनाकडून पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परिणामी कैक कालावधी पासून वाळू अभावी सर्वसामान्यांचे घर बांधकामासह इतर बांधकाम ठप्प झाले आहे. या संधीचा फायदा घेऊन काही वाळू तस्कर अवैधरित्या नाल्यातून वाळू चोरी करून दामदुप्पट दराने वाळू विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत जगताप यांना मिळाल्याने त्यांनी दि.8 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नायब तहसीलदार कैलास जेठे, पोउपनि संदीप अन्येबोईनवाड यांचे सह कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथकाद्वारे धाडसी कारवाई करत एक ट्रॅक्टर वाळू भरून जात असताना पकडला तर दुसऱ्या कारवाईत नाल्यावर ट्रॉली लावून वाळू भरत असलेली ट्रॉली जप्त करण्यात आली. तर आज दि.9 रोजी विनापरवानगी मुरमाची वाहतूक करणारा हायवा पकडता.लगातार दोन दिवसांत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक विरोधात तीन धडाकेबाज कारवाया केल्याने अचानक खळबळ माजली असून,वाळू तस्करांसह इतर गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया आधीच कैक कालावधी पासून रखडलेली त्यात जैसे तैसे झालेल्या लिलाव बोलीत बोली व महसूल भरनाअभावी पूढे ढकलण्यात आली. त्यामुळे या वाळूचे जतन करणे क्रमप्राप्त असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजीत जगताप, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी महसूल आणि पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करून पैनगंगा नदी पात्रावरील सर्व वाळू घाटावर करडी नजर ठेवली आहे.
त्यामुळे वाळू तस्करी पूर्णपणे बंद असून काही वाळू तस्कर नाल्यातील वाळू तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत असल्याने तहसीलदार अभिजीत जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे हे स्वतः दि.०८ रोजी रात्री ११ वाजता गस्तीवर असताना अंजनखेड ते रूपानाईक तांडा या रस्त्यावर पथकास सोनालीका ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून जात असल्याचे दिसून आल्याने त्यांनी त्यास अडविले असता चालक ट्रॅक्टर थांबवून पसार झाला. त्या ट्रॅक्टरला माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत अंजनखेड ते नाईकवाडी रस्त्यावरील नाल्यावर एका ट्रॉलीत मजूर वाळू भरत असलेले दिसल्याने तेथे वाहन थांबवून बघितले असता मजुरांनी पोबारा केला. यावेळी दुसऱ्या ट्रॅक्टरचे मुंडके लावून सदरील ट्रॉली माहूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली.
तर तिसऱ्या घटनेत दि.०९ रोजी पालाईगुडा फाटा येथे विनापरवानगी मुरमाची वाहतूक करत असलेला एक हायवा आढळून आल्याने त्या हायवा वाहनालाही माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले आहे.
सदरील धाडसी कारवाईत पोका ज्ञानेश्वर खंदाडे, महसूल सहाय्यक मनोहर चेके, सुनील वणवे, डी.वाय. एरडलावार, सी.पी.बाबर, सुमित नैताम, ग्राम महसूल अधिकारी बंडू चिरंगे, लक्ष्मण मेश्राम, सुमित नैताम, प्रदीप कदम, विवेक नागपुरे, पवन पाटील यांचे सह या कारवाईत सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी, कोतवाल यांनी सहभाग घेतला.























