तभा फ्लॅश न्यूज/ माहूर : धानोरा गावाजवळील पैनगंगेच्या पात्रातून वाळू चोरी करून ट्रॅक्टर मध्ये भरुन घेऊन जात असलेल्या तब्बल पाच ट्रॅक्टर मालक चालकांचा माहूर तहसीलदार व पथकाशी आमनासामना होऊन जागेवरच वाळू फेकून देत पाठलाग करणाऱ्या तहसीलदार व महसूल पथकाला गुंगारा देऊन पाचही ट्रॅक्टर घेऊन चोरट्यांनी पैनगंगा नदी पात्रातून धूम ठोकली.याविषयीची फिर्याद माहूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून,तीन विना नंबर पासिंगसह अनोळखी पाच ट्रॅक्टर चालक मालक विरोधात विनापरवाना अवैधरीत्या वाळू उपसा करून चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहूर तालुक्यातील तलाठी सज्जा दिगडी अंतर्गत धानोरा गावाजवळील पैनगंगा नदी पात्रातील वाळू उपसा करून ट्रॅक्टर मध्ये वाळू भरुन चोरी करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंथूला यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकासह सदरील ठिकाणी कार्यवाहीसाठी तात्काळ धाव घेतली असता, त्याठिकाणी वाळूने भरलेले तब्बल पाच ट्रॅक्टर व महसूल पथक आमनेसामनेची परिस्थिती निर्माण होऊन वाळू तस्करांनी पाचही ट्रॅक्टर मधील वाळू जुन्या गावठाणाजवळ खाली टाकून देत ट्रॅक्टरसह नदीपात्रातून पलिकडच्या काठावरील विदर्भात धूम ठोकली.यावेळी सध्या नदी पात्रात मुबलक प्रमाणात पाणी असल्याने तहसीलदारांनी शासकीय वाहनाऐवजी मोटरसायकलने जीव धोक्यात घालून पाठलाग करत सदरील ट्रॅक्टर पकडण्याचा धाडसी प्रयत्न केला,मात्र वाळू तस्कर ट्रॅक्टर घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. एकीकडे तहसीलदार काकडे यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच मात्र दुसरीकडे वाळू तस्करांचे धाबे नक्कीच दणाणले असणार यात शंकाच नाही.
या कारवाईत तहसिलदार मुगाजी काकडे यांचेसह शंकर मल्लारी चंदणकर (मंडळ अधिकारी वानोळा), विलास लक्ष्मण शेडमाके (वाहन चालक, तहसील),पोलीस पाटील बालाजी गोविंद कवाने हे सर्वजन नदिपात्राकडे जात असताना नदिपात्राचे काठाजवळ गेले असता पैनगंगा नदिपात्रातुन वाळुने भरलेले पाच ट्रक्टर रोडवर येत होते.जीप ट्रॅक्टरकडे येत असल्याचे पाहुन ट्रॅक्टर चालकांनी जुन्या गावठाणाजवळ आपल्या ट्रक्टरमधील वाळु रोडच्या बाजुला खाली टाकुन पळून जात होते.
तहसिलदार काकडे यांनी ट्रॅक्टर चालकांना ट्रॅक्टर थांवविण्यास सांगीतले असता त्यांनी ट्रॅक्टर थांबविले नाही. उलट पैनगंगा नदी पात्रातील पाण्यातून त्यांनी ट्रॅक्टर टाकून विदर्भात पळून नेले.यावेळी त्यांचा मोटरसायकलद्वारे पाठलाग नदीपात्रापर्यंत तहसीलदार काकडे यांनी केला परंतु ते हाती लागले नाहीत.
त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दोन ट्रॅक्टरचे नंबर लिहून घेतले ज्याचे क्रमांक एमएच 29 टीई 0212, एमएच 38 बी 1080 असे असून, तीन ट्रॅक्टरवर पार्सीग क्रमांक नव्हते.असे एकुन पाच ट्रॅक्टरचे चालक मालकांनी विनापरवाना अवैधरित्या पैनगंगा नदीपात्रातील पाच ब्रास वाळु किमंत 30,000 रुपये चा उपसा करुन चोरी केल्याची फिर्याद ग्राम महसूल अधिकारी पेंटेवाड यांनी दिल्याने माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी तात्काळ ट्रॅक्टर चालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पळवून नेलेले ट्रॅक्टर शक्य तितक्या लवकर जमा करण्यात येतील अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिलीअसून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप सुरेशराव अन्येबोईनवाड हे करीत आहेत.