सोलापूर – भीमा व सीना नदीच्या संगमात काटोकाठ भरलेले निळेश्वर पाणी, घाटावर साकारण्यात आलेली सुंदर रंगावली, हजारो दिव्यांनी उजळलेले प्रकाश, सूर्य मावळतीला जातानाचा सोनेरी रंगाचा पडलेली छाया, मुखी नमामि गंगे हर हर गंगे चा गजर, संगमेश्वर महाराजांचा जयजयकार अशा भक्तिमय वातावरणामध्ये रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास हत्तरसंग कुडल येथे संगम आरती करण्यात आली.
नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रवीवारी दि.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी संगम आरती आयोजित करण्यात आली होती. मल्लिकार्जुन बिराजदार यांच्याहस्ते संकल्प पूजा करून संगम आरती करण्यात आली.
प्रारंभी दीपप्रज्वलन प्रा. निलेश भिडे, सिद्धेश्वर बिराजदार, राजू लेंगरे यांच्याहस्ते तर विठ्ठल विजापूरे यांच्या हस्ते ओटी भरून नदीला नैवेद्य अर्पण करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. प्रारंभी संगमेश्वर मंदिरापासून ते संगम घाटापर्यंत संबळाच्या निनादात आरती आणण्यात आली.
कृषी संस्कृतीचा विकास व्हावा, भीमा-सीना संगम नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अखंड वाहत रहावा, नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगमेश्वर देवस्थान समिती आणि भक्त मंडळांच्या वतीने संगम आरती आयोजित करण्यात आली होती. यंदा आरतीचे सातवे वर्ष होते.
यावेळी काशिनाथ कुडले, मल्लिकार्जुन पाटील, संगप्पा केरके, आडत व्यापारी मल्लिनाथ बिराजदार, अण्णाराव पाटील, बसवराज बिराजदार, मधुकर बिराजदार हणमंत बगले, पंडित पुजारी, चिदानंद पुजारी, मल्लप्पा पाटील, आदी उपस्थित होते.
दिव्यांनी उजळले घाट
संगम घाटावर हजारो दिवे लावण्यात आल्याने सूर्यास्ताच्या वेळेस परिसरामध्ये प्रकाशमय बनले होते. प्रत्येक जण एकेक दिवा लावत जीवनातील अज्ञानाचा नाश होऊन प्रकाशमय व्हावे याची मनोकामना करताना दिसत होते.

























